पुणे : सणासुदीमुळे पुण्यातील घरांच्या बाजारपेठेत तेजी दिसत आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात घरांच्या खरेदी-विक्रीचे १३ हजार ५५७ व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी पितृपंधरवडा उशिरा आल्याने सप्टेंबरमध्ये घरांचे व्यवहार कमी झाले होते. यंदा तो लवकर आल्याने सणासुदीची खरेदी सप्टेंबरमध्येच सुरू झाल्याचे चित्र आहे.

नाइट फ्रँक इंडियाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याचा सप्टेंबर महिन्यातील घरांच्या व्यवहाराचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुण्यात सप्टेंबरमध्ये घरांचे १३ हजार ५५७ व्यवहार झाले. त्यातून ५२३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ११ हजार ५६ घरांचे व्यवहार झाले होते आणि त्यातून ५०८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. गेल्या वर्षी पितृपंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान होता. पितृपंधरवड्यात घर खरेदी अशुभ मानली जाते. त्यामुळे त्यावेळी घरांचे व्यवहार कमी झाले होते. यंदा पितृपंधरवडा ७ ते २१ सप्टेंबरदरम्यान आला. त्यानंतर नवरात्र २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान होते. पितृपंधरवडा संपल्यानंतर ग्राहकांनी नवरात्रीत घरांचे व्यवहार सुरू केले. त्यामुळे यंदा सप्टेंबरमध्ये घरांची विक्री वाढलेली दिसून येत आहे.

पुण्यात यंदा जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान घरांचे १ लाख ४५ हजार ६५१ व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४१२ घरांचे व्यवहार झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या एकूण व्यवहारात ५ टक्के वाढ झाली आहे. यंदा जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान घरांच्या व्यवहारातून ५ हजार ५८३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ५ हजार २५३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. यंदा त्यात ६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक मागणी

पुण्यात परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक मागणी आहे. पुण्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या घरांच्या व्यवहारात ५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचा वाटा ५९ टक्के आहे. त्यात २५ लाख रुपयांपर्यंत आणि २५ ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण अनुक्रमे ३० टक्के व २९ टक्के आहे. याचबरोबर ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण १६ टक्के, १ ते २.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण १२ टक्के, २.५ ते ५ कोटी किमतीच्या घरांचे प्रमाण २ टक्के आणि ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण १ टक्क्याहून कमी आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सणांच्या तिथी मागेपुढे झाल्याने घरांच्या व्यवहारावर काय बदल होऊ शकतो, हे सप्टेंबरच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत २३ टक्के वाढ झाली आहे. पुण्यात घरांच्या मागणीत सातत्य दिसून येत आहे. – शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया