राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची जिल्ह्यातील २३६ कामे पूर्ण झाली आहेत. २५३ गावांमधील पिण्याच्या पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी १७ कामांमध्ये तांत्रिक समस्या आहेत. मात्र ही कामे या महिनाअखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रतिव्यक्ती ४० लिटर पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन आहे, तर जलजीवन मिशनअंतर्गत मात्र प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाण्याचे नियोजन आहे. जलजीवन मिशन सुरू झाल्यानंतर ही २५३ कामे सुरूच होती. मात्र, त्याच्या पूर्वीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार या कामांमध्येही प्रतिव्यक्ती ५५ लिटरचा निकष पूर्ण करण्यासाठी अवांतर कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या देशभर जलजीवन मिशन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात येत होता. त्यानुसार या कार्यक्रमांतर्गत २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांत राज्यात सर्वाधिक कामे पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये २५३ कामांचा समावेश होता. जलजीवन मिशनची कामे सप्टेंबर २०२० मध्ये सुरू करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : करोना काळात कर्तव्यावर असताना मृत झालेल्यांचे स्मारक

दरम्यान, कामे पूर्ण केल्यानंतर पुढील वर्षभर देखभाल व दुरुस्तीसाठी मंजूर निधीतून कंत्राटदाराचा दहा टक्के निधी राखून ठेवला जातो. अशा ६४ पूर्ण झालेल्या कामांचा उर्वरित दहा टक्के निधी देण्यात आला आहे, तर १७२ कामांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. उर्वरित १७ कामांमध्ये काही तांत्रिक समस्या आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.