करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असताना जिल्हा परिषदेच्या ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांची आठवण राहावी आणि त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावे यासाठी जिल्हा परिषदेने त्यांचे स्मारक उभारण्याचे ठरवले आहे.राष्ट्रसेवेत असताना प्राण गमावलेल्या जवानांच्या स्मरणार्थ अशी स्मारके बांधण्यात येतात. त्याच धर्तीवर हे स्मारक असणार आहे. या स्मारकाचा आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समितीची स्थापना केली आहे. ही समिती जिल्हा परिषद परिसरातील सार्वजनिक जमिनीचा वापर करण्यासाठी राज्य सरकार, जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आणि शहर पोलिसांकडून सर्व परवानग्या घेणार आहे. या परवानग्या घेतल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> ‘ई-चावडी’द्वारे घरबसल्या कर भरण्याची सुविधा

जिल्हा परिषदेतून करोना काळात प्रत्येक विभातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या होत्या. त्यामध्ये माहिती संकलनापासून ते थेट रुग्णालयात जाऊन काहींना नोंदी ठेवण्याचे काम सोपवले होते. याशिवाय प्राणवायू व खाटांचे नियोजन, आपत्कालीन परिस्थितीत तयार असलेले कर्मचारी आणि कार्यालयातून नियमित काम बघण्याची जबाबदारी अनेकांवर सोपवली होती. करोना काळात जिल्हा परिषदेतील मृत झालेले ३५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी बहुतांश जण एकतर रुग्णालयात सेवा देत होते किंवा आरोग्य विस्तार सेवा प्रदान करत होते. त्यामुळे त्यांचे स्मारक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.