पुणे : मुलीला अनिवासी भारतीय विद्यार्थी (एनआयए) कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लष्करातील निवृत्त जवानची २७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत निवृत्त जवानाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (दोघे रा. चिखली), माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपी शिंदे, सूर्यवंशी आणि तुपेरे यांच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना तुमच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविले होते. अनिवासी भारतीय विद्यार्थी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून रोख, तसेच ऑनलाइन स्वरुपात गेल्या वर्षभरात २७ लाख २६ हजार रुपये उकळले.
हेही वाचा – प्रकाश आंबेडकर म्हणाले, “तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगल…”
पैसे दिल्यानंतर आरोपींकडे प्रवेशाबाबत त्यांनी विचारणा केली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने देशभरातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला विमाननगर परिसरातून अटक करण्यात आली होती. पुणे शहरात मोठ्या संख्येने परराज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पालकांना प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. राहुल तुपेरे हे मनसेचे माजी नगसेवक आहेत. पानमळा भागातून ते निवडून आले होते.