पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची दुसरी यादी उद्या, शुक्रवारी (१२ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येणार असून, या प्रवेश यादीत महाविद्यालय जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपर्यत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

अकरावी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. यंदा ३०५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. आतापर्यंत पहिल्या फेरीत २५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर राखीव जागांवर (कोटा) ५ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश अर्ज आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी ७ ते ९ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता प्रवेशासाठीची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे पहिल्या फेरीत पसंतीचे महाविद्यालय मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या फेरीच्या यादीकडे लक्ष लागले आहे. दुसरी फेरी १७ ऑगस्टला संपल्यानंतर तिसऱ्या फेरीची प्रक्रिया १८ ऑगस्टपासून राबवण्यात येईल.