पुणे : मेफेड्रोन तस्करी करणाऱ्या सराइतांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी), पाच मोबाइल संच, दुचाकी असा नऊ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मतीन हुसेन मेमन (वय २५, रा. हादीया हाईटस, कोंढवा ) फैजल नौशाद मोमीन (वय २६, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द ) फैयाज युसुफ शेख (वय ३६, रा. मारुती आळी, गणपती चौक, कोंढवा), सूरज राजेद्र सरतापे (वय २८, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर, पुणे-सोलापूर रस्ता) अशी अटक केलेल्या सराइतांची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेमन, मोमीन, शेख, सरतापे हे सराइत आहेत चौघे जण महंमदवाडीतील वन विभागाच्या मोकळ्या जागेत सोमवारी (६ ऑक्टोबर) थांबले होते. चौघे जण मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी चाैघांकडून साडेसात लाख रुपयांचे ३७.६० ग्रॅम मेफेड्रोन, पाच मोबाइल संच, दोन दुचाकी असा नऊ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त विजय कुंभार, अमली पदार्थ विराेधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस कर्मचारी संदीप शिर्के, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, नितिन जाधव, सुहास डोंगरे, संजय राजे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी ही कामगिरी केली.

शहरात मेफेड्रोन, गांजा विक्री करणारे सराइत, तसेच त्यांना अमली पदार्थ पुरविणाऱ्या तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. मेफेड्राेन महाग आहे. त्यातुलनेत गांजा स्वस्त असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री, तस्करी करण्यात येते. परराज्य, तसेच परगावातून गांजा शहरात विक्रीस पाठविला जतो.

अनेक तरुण गांजाच्या आहारी गेले आहेत. गांजाच्या नशेत गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले जातात. वस्ती भागात गांजाची विक्री छुप्या पद्धतीने केली जाते. गांजा विक्री करणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यातील तपास पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत शहर, तसेच उपनगारातून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.