पिंपरी-चिंचवड शहरात दोन व्यक्तींकडून ७ लाख ५४ हजारांचा ३० किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे. बाळू महादेव वाघमारे आणि रवींद्र प्रकाश घाडगे अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी शिरपूर, धुळे येथून ठोक स्वरूपात ३० किलो गांजा आणला. तो, शहरात किरकोळ स्वरूपात चढ्या दराने विकणार होते असं पोलीस तपासात समोर आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील भुजबळ चौक येथे दोन व्यक्ती प्रवासी बॅगेत गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, भुजबळ चौक येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचला. काही वेळाने रिक्षातून बाळू वाघमारे आणि रवींद्र घाडगे हे दोघे उतरले. त्यांच्याकडे एक प्रवासी बॅग होती, त्यात गांजा असल्याची पोलिसांची खात्री पटली. त्यांना ताब्यात घेऊन बॅगेची तपासणी केली असता ७ लाख ५४ हजारांचा ३० किलो गांजा पोलिसांनी जप्त केला.

शिरपूर धुळे येथून राजू नावाच्या व्यक्तीकडून ठोक स्वरूपात गांजा आणला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दोन्ही आरोपी हे पिंपरी-चिंचवड शहरात चढ्या दराने विकण्यासाठी आणला होता, असं पोलिसांनी सांगितले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.