इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांचे निरीक्षण

पुणे : करोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत खासगी कं पन्यांकडून घरातून काम (वर्क फ्रॉम होम) आणि शाळा-महाविद्यालयांकडून ऑनलाइन शिक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या विक्रीत सुमारे ३० टक्के  वाढ झाल्याने निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले आहे.

करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. टाळेबंदीमुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली, तर कं पन्यांतील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सूचना देण्यात आली. मात्र अर्थचक्र पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाकडून गेल्या महिनाभरात टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात येऊ लागले. मात्र, गर्दी टाळण्यासाठीचे निर्बंध कायम आहेत. त्यात कमी कर्मचाऱ्यांसह खासगी कं पन्या सुरू करण्यात आल्या आहेत, तर अन्य कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावे लागत आहे. शाळा-महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू के ले आहे. या पार्श्वभूमीवर गरज म्हणून स्मार्टफोन, लॅपटॉप खरेदीकडे कल वाढला आहे. पुणे इलेक्ट्रॉनिक हायर परचेस असोसिएशनचे सचिव राजेश अगरवाल म्हणाले, की साधारणपणे एक जूनपासून स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या खरेदीत वाढ झाली आहे. करोना विषाणू संसर्गामुळे ऑनलाइन शिक्षण आणि घरातून करावे लागणारे काम ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. साधारणपणे विक्रीमध्ये ३० टक्के  वाढ झाली आहे. संगणकाच्या तुलनेत लॅपटॉपसाठीची जास्त मागणी आहे. तर लॅपटॉपमध्ये २० ते ३० हजारच्या लॅपटॉपना जास्त मागणी आहे.  अद्याप करोनाचा प्रादुर्भाव असल्याने काही परिसरातील निर्बंध कायम आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. आधी उपलब्ध वस्तू आणि मागणीनुसार उपलब्ध होणाऱ्या वस्तू यानुसार व्यवसाय करावा लागत आहे, असेही अगरवाल यांनी सांगितले.

जास्त क्षमतेच्या स्मार्टफोनना मागणी

स्मार्टफोनच्या वाढलेल्या विक्रीमध्ये साधारणपणे ८ हजार ते १७ हजारांपर्यंतच्या स्मार्टफोनला जास्त मागणी आहे. त्यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येणाऱ्या स्मार्टफोनची मागणी सर्वाधिक आहे. सध्या शाळांकडून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. तर जास्त क्षमतेच्या चित्रफिती डाउनलोड करण्यासाठी पुरेशी मेमरी फोनमध्ये असावी हा विचार त्यानमागे आहे. कमी क्षमतेचा स्मार्टफोन घेतल्यास त्यावर ताण येऊन तो सतत बंद पडण्यासारखे प्रकार घडतात. त्यामुळे चांगल्या दर्जाचा फोन घेण्याकडे विद्यार्थी-पालकांचा कल आहे, असे निरीक्षण असोसिएशनचे माजी सचिव आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यावसायिक विनोद अगरवाल यांनी नोंदवले.

संगणक-लॅपटॉप दुरुस्तीही जोरात

अनेक व्यावसायिकांनी दुकानाबाहेर संगणक-लॅपटॉप दुरुस्ती उपलब्ध असल्याचे फलक लावले आहेत. त्यामुळे संगणक, लॅपटॉपच्या दुरुस्तीचीही कामेही मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.