पिंपरी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील सुमारे ३२ पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आहेत. संबंधित पर्यटक हे आकुर्डी, रावेत, चिंचवड, भोसरी परिसरातील आहेत. पिंपरी-चिंचवडहून काश्मीरला गेलेले ३२ जण असून, त्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांचा समावेश आहे. पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून चर्चा केल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
‘आदल्याच दिवशी बैसरन व्हॅलीत’
शिवसेना (ठाकरे) युवा सेनेचे चेतन पवार हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत श्रीनगरमध्ये आहेत. पवार म्हणाले, पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाल्याचे कळाले. हल्ला झालेल्या बैसरन व्हॅली येथे आदल्याच दिवशी आम्ही सहकुटुंब गेलो होतो. या घटनेनंतर आमच्यासोबत असलेले पर्यटक भयभीत आहेत. श्रीनगर येथे सध्या आम्ही सुरक्षित आहोत. आमच्या सोबत अन्य ठिकाणांहून आलेले पर्यटकही आहेत. आमदार सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांच्याकडून सहकार्य करण्यात येत आहे.’
राजकीय पक्षांकडून निषेध
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला. भाजपने मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर, शिवसेना (शिंदे) पक्षाने चिंचवड येथे, तर महाविकास आघाडीने पिंपरी चौकात हल्ल्याचा निषेध केला.
पिंपरी-चिंचवडमधील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संपर्क साधला आहे. समन्वय अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
जम्मू-काश्मीरमध्ये शहरातील किती लोक आहेत, याबाबत निश्चित आकडा सांगता येत नाही. तेथील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. नागरिकांना मदत मिळवून दिली जात आहे. संबंधित पर्यटकांच्या नातेवाइकांशी संपर्कात आहोत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड