रेल्वेतून प्रवास करणाऱ्या फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे उदाहरण २ मार्चला झालेल्या कारवाईतून समोर आले. रेल्वे प्रशासनाच्या वतीने पुणे-गोरखपूर या गाडीमध्ये करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत तब्बल ३३७ फुकटे प्रवासी सापडले. रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने एखाद्या ठिकाणी किंवा ठराविक गाडीमध्ये एकाच वेळेस अचानकपणे तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येते.
त्यानुसार २ मार्चला पुणे-गोरखपूर या गाडीमध्ये पुणे ते दौंड दरम्यान तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये ३३७ प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ३ लाख ५८ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. त्याचप्रमाणे योग्य तिकिटावर प्रवास न करणाऱ्या ४४७ प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून अडीच लाखांच्या दंडाची वसुली करण्यात आली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सहायक वाणिज्य व्यवस्थापक वसंत कांबळे यांच्या निरीक्षणाखाली या मोहिमेत १३ तिकीट तपासनिसांनी सहभाग घेतला.