पुणे : जिल्ह्यातील घाटमाथ्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडला असून, ताम्हिणी येथे तब्बल ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे घाट, मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण होत आहे. परिणामी, गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने घाटमाथ्यासाठी रेड अलर्टही दिला आहे. घाटमाथ्यावर पडत असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे नद्या, ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच जनजीवनही विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ताम्हिणी येथे सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वाधिक ३७० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. तर लोणावळा येथे २०५, कुरवंडे येथे १२९.५, गिरीवन येथे १०८.५, माळीण येथे १०४.५, भोर येथे ७९ मिलीमीटर पाऊस पडला.