शहर आणि ग्रामीणमध्ये ११,७९० अपघात; ९,५८२ जखमी; रस्ता सुरक्षा समितीच्या पहिल्या बैठकीत आकडेवारी सादर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहर आणि ग्रामीण विभागात वाहनांची वाढती संख्या आणि बेजबाबदारपणे वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातांत नागरिकांचा नाहक बळी जात आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या पहिल्याच बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांमध्ये पुणे शहर आणि ग्रामीण भागात एकूण ११ हजार ७९० अपघातांची नोंद झाली. त्यात ४ हजार ४१२ नागरिकांचे बळी गेले, तर ९ हजार ५८२ नागरिक जखमी झाले. सन २०१५ च्या तुलनेत अपघात आणि मृतांची संख्या २०१७ मध्ये किंचितशी घटली असली, तरी रस्ते अपघातात नाहक जाणाऱ्या बळींबाबत चिंता व्यक्त करीत अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

मोटार वाहन कायद्यानुसार रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर रस्ता सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. रस्ते अपघातांची कारणे, उपाययोजना आणि त्याअनुषंगाने उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करणे, हा या समित्यांच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. पुणे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार या नात्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे आहे. या समितीची पहिलीच बैठक नुकतीच पार पडली. पुणे शहरात माणशी एक वाहन झाले आहे. त्यामुळे वाढत्या वाहनसंख्येचा मुद्दा आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यात पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, पुणे- बंगळुरु बाह्यवळण मार्ग, पुणे- सोलापूर, पुणे- नगर, पुणे-नाशिक आदी प्रमुख मार्ग येतात. या मार्गावरही सातत्याने अपघात होत असतात.

आढळराव यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अपर जिल्हाकिारी रमेश काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बी. आय. आजरी, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि समितीचे सदस्य सचिव संजय राऊत, विनोद सगरे, अनिल वळीव, आनंद पाटील आदींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते. रस्ते अपघाताच्या भीषण समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची स्थापना असून, वाहतूक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने गाव, तालुका, शहर पातळीवर एक कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने अपघातांची कारणे, त्यास जबाबदार घटक, अपघात टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे खासदार, आमदारांनी काही सूचना मांडल्या आणि अध्यक्षांनी बैठकीत विविध निर्णय जाहीर केले.

अध्यक्षांनी जाहीर केलेले निर्णय

* जिल्ह्य़ातील रस्ते आणि महामार्ग बांधणी करणाऱ्या सर्व कंपन्यांनी रस्ता सुरक्षा अहवाल सादर करावा.

* ग्राम पातळीवर रस्ता सुरक्षा अभियानासाठी प्रत्येक तालुक्यात ट्रॅफिक पार्क उभारण्यात येईल.

* रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपायांचा आर्थिक अंदाजपत्रकासह कृती आराखडा सादर करावा.

* जिल्ह्य़ातील रस्ते, महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण करून कृती आराखडा सादर करावा.

खासदार, आमदारांनी केलेल्या सूचना

*  द्रुतगती मार्गावर बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्यांवर आणि बंदी असतानाही दुचाकी वाहने द्रुतगती मार्गावर आणणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. द्रुतगती मार्गावर जनावरे येतात, ही गंभीर बाब असून, मार्गाच्या दोन्ही बाजू संरक्षक जाळीने तातडीने बंदिस्त कराव्यात.              – अनिल शिरोळे, खासदार

*  मुंबई- बंगळुरु महामार्गावर नवले पुलाजवळ वारंवार अपघात होत असतात. त्याबाबत रस्ते बांधणी विभागाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. – भीमराव तापकीर, आमदार

*  बेशिस्त वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी ड्रोनचा वापर करावा. अपघातातील एका व्यक्तीच्या अवयवदानाने सहा व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. परिवहन विभागाने वाहन चालविण्याचा परवाना देताना अवयवदानाचे अर्ज भरून घ्यावेत.  -अमर साबळे, खासदार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4412 deaths in road accidents in pune in three years
First published on: 23-01-2018 at 03:18 IST