पुणे : बँकेत भरणा करण्यासाठी पैसे घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून कोयत्याचा धाक दाखवित त्याच्याकडील ४७ लाखांची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी सकाळी नाना पेठेत घडली. या घटनेचे एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच समर्थ पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या मागावर पथके रवाना केली आहेत. याबाबत मंगलपुरी भिकमपूरी गोस्वामी (५५, रा. मंगळवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा दुचाकीस्वारांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोस्वामी हे पन्ना एजन्सी नावाने चालविण्यात येणाऱ्या व्यावसायिकाकडे काम करतात. व्यवसायातून आलेली ४७ लाख २६ हजार रुपये रक्कम व १४ धनादेशष असलेली बॅग घेऊन गोस्वामी बँकेत निघाले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते नाना पेठेतील सिटी सर्व्हे नंबर ३९५ येथील रस्त्यावरून जात असतानाच पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना धक्का दिला. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुचाकीला आरोपींनी त्यांची गाडी आडवी घालून हाताने मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग जबरदस्तीने घेवून पसार झाले. या मारहाणीत फिर्यादींच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : आईने चापट मारली म्हणून १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त संदीपसिंह गिल, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. समर्थ पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून आरोपींचा माग काढण्यात येत आहे.