पुणे : सणासुदीचा काळ उत्सव, भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा असतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती, मर्यादित काळासाठी विक्री आणि कॅशबॅक जाहिराती मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. यामुळे खरेदीचा निर्णय वेगाने घेण्यास प्रोत्साहन मिळते. सणासुदीच्या या दिवसात अनेकजण चांगली डील मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, घोटाळे करणाऱ्यांना खरेदी करणाऱ्यांच्या या मानसिकतेची जाणीव असते आणि अनेकदा सोशल इंजिनीअरिंगद्वारे त्यांचा गैरफायदा घेतात. तंत्रज्ञानामुळे अनेक घोटाळे होत असताना, जागरूकता आणि काही जागरूक पावले ग्राहकांना सुरक्षित आणि विना अडथळा खरेदीचा अनुभव घेण्यास मदत करू शकतात, असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) म्हटले आहे.

एनपीसीआय ही देशातील बँकिंग व डिजिटल व्यवहारांची शिखर संस्था आहे. एनपीसीआयने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी पाच टिप्स दिल्या आहेत .

१) अधिकृत ऍप्स आणि वेबसाइट्सवरूनच खरेदी करा :

सणासुदीच्या हंगामात फसवणूक करणारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि पेमेंट तपशील चोरण्यासाठी एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाइट्स आणि लिंक्स तयार करतात. यामुळेच जिथून खरेदी करणार असाल त्या साइटचा वेब आयडी स्वतः टाका किंवा अधिकृत ऍप वापरा. ​​प्रमोशनल ईमेल, एसएमएस किंवा फॉरवर्ड केलेल्या मेसेजमधील लिंक्सवर क्लिक करणे टाळा. माहिती नसलेल्या स्त्रोतांवरील फाइल्स डाउनलोड करू नका किंवा लिंक्सवर क्लिक करू नका, कारण त्यामध्ये हानिकारक सॉफ्टवेअर असू शकते आणि ते तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकते.

२) फक्त संबंधित ऍपमध्येच पेमेंट पूर्ण करा :

काही घोटाळ्यांमध्ये ग्राहकांना सुरक्षा तपासणी वगळून शॉपिंग ऍप किंवा साइटच्या बाहेरील यूपीआय आयडी किंवा लिंक्सवर पैसे देण्याचा आग्रह धरतात. त्यामुळेच नेहमी अधिकृत चेकआउट पेजवर व्यवहार पूर्ण करा आणि विक्रेत्याची माहिती नीट पाहून घ्या.

३) मोफत व्हाउचर आणि कॅशबॅक आश्वासनांबाबत सावधगिरी बाळगा :

रिवॉर्ड्स, कॅशबॅक किंवा सणासुदीच्या भेटवस्तू देणाऱ्या मेसेजमध्ये ओटीपी, खात्याचे तपशील किंवा लहान “शुल्क” मागितले जाऊ शकते. ज्या ऑफर्स खऱ्या असतात त्यासाठी संवेदनशील माहिती किंवा आगाऊ पेमेंटची आवश्यकता नसते. त्यामुळे यावर क्लिक करण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घ्या आणि पडताळणी करा.

४) ओटीपी मागणाऱ्या मेसेजमागचा इशारा समजून घ्या :

पेमेंट अयशस्वी झाले आहे किंवा खाते ब्लॉक केले आहे असे सांगत काही मेसेज ओटीपी सांगण्यास सांगतात. मात्र, असे सांगितल्यास कधीही ओटीपी देऊ नये. ओटीपी हा केवळ ग्राहकांनी सुरू केलेल्या व्यवहाराची खात्री करण्यासाठी असतो. बँका किंवा पेमेंट ऍप्स कधीही कॉल किंवा मेसेजद्वारे ते विचारत नाहीत.

५) कोणत्याही दबावाखाली व्यवहार करू नका :

घोटाळे करणारे किंवा फसवणारे ऑफर लवकरच संपेल किंवा तुम्ही कारवाई न केल्यास तुमचे खाते ब्लॉक होईल असे सांगून तुम्ही घाईने व्यवहार करावा अशी परिस्थिती निर्माण करतात. या उलट संबंधित कंपन्यांचे अधिकृत ऍप्स कधीही अशा प्रकारे मागे लागत नाहीत किंवा घाईघाईने व्यवहार करण्यास भाग पाडत नाहीत. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी खात्री करून घ्या.

‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’

सुरक्षित व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ हे तत्त्व स्वीकारले पाहिजे. कोणतेही संशयास्पद मेसेज आल्यास त्याचा थोडं थांबून, विचार करून, माहितीची पडताळणी करून आणि हुशारीने वागून ग्राहक स्वतःचे रक्षण करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील माहिती जपून ठेवू शकतात, ज्यामुळे व्यवहाराचा सुरक्षित अनुभव निश्चित होतो, असा सल्लाही एनपीसीआयने दिला आहे.