पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमची अद्दल घडवेल,’ असे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. ‘राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे अजित पवार यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली, त्यानंतर ते बोलत होते. आमदार बापू पठारे, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक डाॅ. सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
‘जातनिहाय जनगणना व्हावी अशी अनेक दशकांपासूनची मागणी होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने जातनिहाय जनगणन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे सर्व समाज घटकांना न्याय हक्क मिळण्यास मदत होणार आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, ‘देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या महाराष्ट्राचा देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पादनात (जीडीपी) साडेतेरा टक्के इतका वाटा आहे. राज्यात रस्ते आणि पूल आदी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महाइनविट’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र देशातील प्रथम राज्य ठरले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर शेतीला थेट फायदा होणार आहे.
पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव अजित पवार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सेवा बजाविलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष पदक तसेच कामगार विभागाकडील कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवेसाठी प्रोत्साहनात्मक प्रशस्तीपत्र तर, महसूल विभागातील जिल्हा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पवार यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त परेड संचलनाचे निरीक्षण केले.