लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणे पोलसांच्या ‘विघ्नहर्ता न्यास’च्या  वतीने देण्यात आलेल्या वैद्यकीय सेवेचा ५८२ नागरिकांना लाभ झाला. गर्दी आणि उन्हामुळे नागरिकांना त्रास झाला असून मंगळवारी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर चार तासांमध्येच १२२ जणांवर उपचार करण्यात आले होते.

उन्हाचा तडाखा आणि अति घामामुळे अंगातील पाणी कमी होऊन चक्कर येणे, गर्दीमुळे श्वास गुदमरणे, ढोल-ताशा पथकाने रंगीत धूर सोडणाऱ्या केलेल्या फटाक्याच्या फवाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या रंगीत धुरामुळे होणारा दमा आणि खोकल्याच्या प्रमाणात वाढ, ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीच्या पत्र्यामुळे होणाऱ्या जखमा ढोल-ताशा वाजवणाऱ्या युवक-युवतींना डोक्यामध्ये टिपरू लागून होणारी जखम यांसह अति आवाज आणि गर्दीमुळे रक्तदाब वाढून चक्कर येणे असे प्रकार आढळून आले.

आणखी वाचा-अखेर २८ तासांनी संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक, शेवटचा गणपती भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाचा

विघ्नहर्ता न्यासतर्फे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर नागरिकांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी व्यवस्था केली जाते. या वर्षीसुद्धा गणेशभक्तांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. सुसज्ज रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्र यांच्या माध्यमातून ११२ डॉक्टर, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी, परिचारिका, स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ही सेवा पुरविण्यात आली.

आणखी वाचा-विसर्जन मिरवणूक दणदणाटीच… लक्ष्मी रस्त्यावर किती होती ध्वनिपातळी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांचे नेतृत्वाखाली डॉ. नंदकिशोर बोरसे, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. प्रीती विक्टर, डॉ. नितीन बोरा, सदाशिव कुंदेन, डॉ. सुजाता कोतवाल, डॉ. कुणाल कामठे, अशोक दोरुगडे, तेजल राठोड, दिनेश मुळे, जयशंकर माने , विठ्ठल वरवडे पाटील यांच्यासह ताराचंद रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, माय माऊली वृद्धाश्रम  या संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होण्याच्या दोन दिवस आधीपासूनच ही सेवा पुरविण्यात येत होती. ५८२ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. काही रुग्णांना जागेवर उपचार करून सोडण्यात आले. तर काही रुग्णांना ताराचंद रुग्णालय, ससून रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.