पुणे : लहान मुलांना अनेक गोष्टींची उत्सुकता असते या उत्सुकतेपयी अनेक वेळा ती टोकाच्या गोष्टी करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका ६ वर्षीय मुलाने चुलीत फटाका ठेवला आणि काय होते, हे तो डोकावून पाहू लागला. चुलीत फटाक्याचा स्फोट झाल्याने त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. डॉक्टरांनी वेळेवर केलेले उपचारामुळे त्याची दृष्टी वाचू शकली आहे.
फटाकेच्या स्फोटामुळे काही सेकंदांतच या मुलाच्या गालावर, ओठांवर, पापण्यांवर खोल जखमा झाल्या तसेच डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली. घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आपत्कालीन विभागातील वैद्यकीय पथकाने या मुलावर तत्काळ उपचार सुरू केले. प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी संपूर्ण रात्र शस्त्रक्रिया करून या मुलाच्या गाल, ओठ आणि पापण्यांच्या जखमा शिवल्या. मात्र सर्वात मोठे आव्हान डोळा वाचवण्याचे होते.
याविषयी नेत्रतज्ज्ञ डॉ. कीर्ती माने म्हणाल्या की, मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. नेत्रपटल आणि नेत्रभिंगापर्यंत ही दुखापत पोहोचली होती. अगदी काही तासांचा विलंबही कायमस्वरूपी अंधत्वास कारणीभूत ठरू शकला असता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. बालकावर आपत्कालीन नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फाटलेला डोळा काळजीपूर्वक शिवण्यात आला आणि बरे होण्यासाठी विशेष लेन्स बसवण्यात आली. विशेष म्हणजे फक्त २४ तासांत मुलाने डोळा उघडला आणि जवळपास ८० टक्के दृष्टी स्पष्ट झाली. केवळ दोन आठवड्यांत त्याची दृष्टी पूर्णपणे पूर्ववत झाली.
डॉ. माने पुढे म्हणाल्या की, या मुलावर उपचार करताना आमची शर्यत प्रत्येक मिनिटाशी होती. वेळेवर शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांमुळे आम्ही केवळ मुलाचा डोळाच वाचवू शकलो नाही, तर त्याची दृष्टी पूर्णपणे परत मिळवून दिली. या मुलाला त्याचे हसू आणि दृष्टी पुन्हा मिळवून देण्यात यशस्वी झालो याचे आम्हाला समाधान आहे. फटाक्यांमुळे होणारे अपघात किती धोकादायक असतात याचेच हे उदाहरण आहे. यामुळे लहान मुलांच्या हाती फटाके देताना पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.