पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कसलाच तोडगा निघत नसल्याचा आरोप करून, मानाच्या पाच गणपती मंडळांअगोदरच सकाळी सात वाजता लक्ष्मी रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय शहरातील ६० सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. ‘पोलीस आणि महापालिका प्रशासन प्रतिष्ठित मंडळांबरोबर बैठक घेत असून, मंडळांमध्ये भेदभाव करत आहेत,’ अशी टीका या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ‘आमचे तरीही प्रशासनाला सहकार्य असेल.
सात ते दहा वाजेपर्यंत आमची जेवढी मंडळे मार्गस्थ होतील तेवढी होऊ द्यावीत. मानाचे गणपती आल्यानंतर आम्ही स्वत:हून त्यांना वाट करून देऊ. मात्र, आम्ही निर्णयावर ठाम आहोत,’ असे रामेश्वर चौक मित्रमंडळाचे सुरेश जैन, होनाजी तरुण मित्र मंडळाचे राहुल आलमखाने, मुठेश्वर मित्र मंडळाचे गणेश भोकरे, सहकार तरुण मंडळाचे भाऊ करपे, जुन्या जाईचा गणपती मित्र मंडळाचे आदेश पारवे, बढाई समाज मंडळाचे शैलेश बढाई, जनार्दन पवळे संघाचे राकेश डाखवे, जगोबादादा तालीम मंडळाचे सनी किरवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे उपस्थित होते.
‘दर वर्षी काही मंडळे नवीन पायंडा पाडत आहे. बेलबाग चौक ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मित्र मंडळाचा मांडव हे अवघे ६० ते ७० मीटरचे अंतर पार करण्यासाठी आम्हाला बारा तास लागतात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो. होनाजी तरुण मंडळाला सव्वाशे वर्षे होत असताना त्यांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथके कमी करून एक पाऊल मागे घेतले, तर या मोठ्या मंडळांनीही एक पाऊल मागे घेतल्यास काय हरकत आहे,’ अशी भूमिका पारवे यांनी मांडली.
‘… तर मिरवणूक वेळेत संपेल’
‘परंपरा, संस्कृतीचे प्रतीक म्हणून मोठी मंडळे सात-सात ढोल-ताशा पथके विसर्जन मिरवणुकीत सहभागी करतात. दुसरीकडे ग्रहण आहे म्हणून दिवस उजाडण्यापूर्वी गणपती विसर्जन करायचे असल्याचे दाखले देतात. त्यामुळे ग्रहण फक्त प्रतिष्ठित गणपतींनाच आहे का, याचा प्रशासनाने विचार करून मंडळांनी एक पाऊल मागे घेऊन मोजकीच ढोल-ताशा पथके आणून सहकार्याची भूमिका घेतली, तर विसर्जन मिरवणूक वेळेत संपेल. दर वर्षी गणेश मंडळांवरून होणाऱ्या वादविवादांमुळे पुण्याची बदनामी थांबेल,’ असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आले.
या मंडळांचा सकाळी सात वाजता निघण्याचा विचार…
त्वष्टा कासार मंडळ, होनाजी तरुण मित्र मंडळ, सराफ सुवर्णकार मित्र मंडळ, जनार्दन पवळे संघ, वीर हनुमान मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, रणमर्द मित्र मंडळ, माती गणपती मित्र मंडळ, गणेश सेवा मित्र मंडळ, श्रीराम अभिमन्यू मित्र मंडळ, कापडगंज मंडळ, जयभारत मंडळ, मेहुणपुरा मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, बाल साईनाथ मित्र मंडळ, अकरा मारुती कोपरा, वैभव मित्र मंडळ, गणेश आझाद मित्र मंडळ, सुभाष मित्र मंडळ, वीर महाराणा मंडळ, योजना मित्र मंडळ, सहकार तरुण मंडळ, बाल समाज मंडळ, श्रीबाल मित्र मंडळ, विजय शिवाजी मंडळ, हसबनीस बखळ, लोकशिक्षण मंडळ, धक्क्या मारुती मित्र मंडळ आदी. —