पुणे: राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी ७६.७५ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, कनिष्ठ महाविद्यालयांना गुरुवारपर्यंतची (१५ मे) मुदत देण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ११ हजार महाविद्यालयांपैकी आठ हजार ४४३ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. महाविद्यालयांच्या पडताळणीचे आणि प्रमाणीकरणाचे काम सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून सुरू आहे. अद्याप नोंदणी पूर्ण न केलेल्या किंवा माहिती अद्ययावत न केलेल्या महाविद्यालयांनी कोणत्याही परिस्थितीत अंतिम मुदतीपूर्वी ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना १९ मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
नोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा मार्गदर्शनासाठी महाविद्यालयांनी सहाय्यता क्रमांक ‘८५३०९५५५६४’ अथवा ईमेल ‘support@mahafyjcadmissions.in’ यावर संपर्क साधावा. सर्व संबंधित महाविद्यालयांनी याची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, असे राज्यस्तर प्रवेश संनियत्रण समितीचे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी सांगितले.