पुणे : विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत ८६ हजार ५४२ दावे तडजोडीत निकाली काढण्यात आले. निकाली काढण्यात आलेल्या दाव्यातून १८३ कोटी ४५ लाख ५९ हजार भरपाई वसूल करण्यात आली. न्यायालयात दाखल, तसेच दाखलपूर्व दाव्यांची संख्या वाढत आहे. दाव्यांची संख्या वाढत असल्याने न्यायव्यवस्थेवर ताण पडत आहे.
अनेक दावे तडजोडीत निकाली काढता येत असल्याने विधी सेवा प्राधिकरणाकडून नियमित लोक अदलात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून शनिवारी (१० मे) आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली काढण्यात आले. यामध्ये ६० हजार ९० दाखलपूर्व आणि २६ हजार ४५२ प्रलंबित दाव्यांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दावे निकाली काढण्यासाठी १२३ पॅनेलची नेमणूक करण्यात आली होती. या पॅनेलसमोर दाखलपूर्व आणि प्रलंबित असे एकूण मिळून दोन लाख दोन हजार ४० दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते.
फौजदारी, दिवाणी, वीजबिले, कामगार वाद, मोटार अपघात दावे, भूसंपादन, वैवाहिक दावे, धनादेशाचे उल्लंघन, महसूल, वीजबिल व पाणीपट्टीची थकबाकी अशा दाव्यांचा यात समावेश आहे. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमित लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते, असे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी नमूद केले.
लोक अदालतीत निकाली काढण्यात आलेले दावे
बँक कर्जवसुली – तीन हजार २२७
तडजोडपात्र फौजदारी गुन्हे – तीन हजार ४९२
वीज देयक – ७३
भूसंपादन – २४
मोटार अपघात दावे – ४०
वैवाहिक वाद दावे – ५५
धनादेश न वटणे – एक हजार ५२१
अन्य दिवाणी दावे – ३०३
पाणीपट्टी – ५२ हजार २६३
अन्य दिवाणी दावे – ३०३ अन्य दावे – १९ हजार ८३६