पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बुधवारपर्यंत पुणे विभागातील ९७ हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील ६० हजार २०४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, पहिल्या फेरीचे अर्ज भरण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुनंदा वाखारे यांनी ही माहिती दिली. शिक्षण विभागाने यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुणे विभागात १ हजार ५३८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठीची नोंदणी २६ मेपासून सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, नियमित पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
पुणे विभागात मंगळवारपर्यंत नोंदणी केलेल्या ९७ हजार १७३ विद्यार्थ्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील ६० हजार २०४ विद्यार्थी, अहिल्यानगर जिल्ह्यातील २२ हजार ३६४, तर सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार ६०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
असे आहे वेळापत्रक
पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ जून
अंतिम गुणवत्ता यादी : ८ जून
शून्य फेरीअंतर्गत कोट्यातील प्रवेश : ९ ते ११ जून
पहिल्या केंद्रीभूत फेरीचे प्रवेश : ११ ते १८ जून
हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
‘इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही राज्य सरकारने लागू केलेल्या विविध नियमावली, ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेचेच कनिष्ठ महाविद्यालय संकेतस्थळावर दिसत नाही. त्यामुळे संस्थांतर्गत कोट्यातील (इनहाउस) प्रवेशासाठीचा सुधारित नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरत आहे. त्यामुळे बदललेला नियम रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे,’ असे हिंदू महासंघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले. याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांना महासंघाने निवेदन दिले आहे.