पुणे : सातारा येथे होणाऱ्या आगामी ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची रविवारी (१४ सप्टेंबर) निवड होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाची येत्या रविवारी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक होणार असून, त्यामध्ये अध्यक्षांची निवड होईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलन होण्याची शक्यता असून, रविवारच्या बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही चर्चा होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ या साहित्य महामंडळाच्या चार घटक संस्थांचे प्रत्येकी तीन, बृहन्महाराष्ट्रातील समाविष्ट आणि संलग्न संस्थांचा प्रत्येकी एक आणि साहित्य संमेलनाध्यक्ष डाॅ. तारा भवाळकर असे १९ जण रविवारच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. घटक संस्था, संलग्न व समाविष्ट संस्थांनी सुचविलेल्या नावांवर सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते संमेलन अध्यक्षपदाच्या नावाची निवड करण्यात येणार आहे.

साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आहे. त्यामुळे ९९, १०० आणि १०१ अशी तीन महत्त्वाची साहित्य संमेलने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नेतृत्त्वाखाली पार पडणार आहेत.

मार्गदर्शक समितीची शनिवारी बैठक

साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची बैठक शनिवारी (१३ सप्टेंबर) होणार असून, त्यामध्ये संमेलनाच्या रूपरेषेवर चर्चा होणार आहे. संमेलनात कोणकोणत्या कार्यक्रमांचा समावेश असावा? ग्रंथदिंडी, परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन याविषयी चर्चेअंती आगामी साहित्य संमेलनाची ढोबळमानाने रूपरेषा निश्चित केली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.