scorecardresearch

लोणावळ्यात दोन वर्षांच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी बंगला मालकासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा

जलतरण तलावात बुडून बालकाचा मृत्यू

लोणावळ्यात दोन वर्षांच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी बंगला मालकासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा
( संग्रहित छायचित्र )

लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरात बंगल्यातील जलतरण तलावात बुडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी पोलिसांनी बंगला मालकासह सहा जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पुष्पव्हिला बंगल्याचे मालक डॉ. प्रमोद काशिनाथ बहाळकर (रा. चेंबूर, मुंबई), बंगल्याची व्यवस्था सांभाळणारे नरेशकुमार मुरलीधर भोजवाणी, राजेश निंबाले (दोघेही रा. मंगल विलास, कैवल्यधाम रस्ता, तुंगार्ली लोणावळा), लोणावळा नगरपरिषदेतील अधिकारी तसेच अन्य तीन जणांच्या विरोधात दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉलमध्ये हजर असलेले इतर तीन इसम (नाव पत्ता माहित नाही) व लोणावळा नगर परिषद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अखिलकुमार नारायणराव पवार (वय ४७, रा. पर्पल ड्रीम सिटी, टाकळी रस्ता, नाशिक) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अखिलकुमार पवार जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरात पुष्पव्हिला बंगल्यात कुटुंबासह आले होते. त्यांनी बंगला भाडेतत्त्वावर घेतला होता. जलतरण तलावाच्या परिसरात खेळणी ठेवली होती. त्या वेळी दोन अखिलकुमार यांचा दोन वर्षांचा मुलगा शिवबा खेळण्यांकडे आकर्षित झाला आणि तो रांगत जलतरण तलावाजवळ गेला. जलतरण तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. लोणावळा पोलिसांकडून तपास करण्यात आला.

तपासात बंगल्यातील जलतरण तलावात सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे काणाडोळा केल्याने दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी बंगला मालकासह सहा जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा (भादंवि ३०४ (अ)) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश बावकर तपास करत आहेत.

बेकायदा जलतरण तलावाकडे काणाडोळा

लोणावळा, खंडाळा परिसरात अनेक धनाढ्यांचे बंगले आहेत. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांना बंगले भाड्याने देण्यात येतात. बंगल्यातील सुरक्षाविषयक उपाययोजनांची जबाबदारी बंगला मालक तसेच संबधितांनी करणे गरजेचे आहे. लोणावळा परिसरातील अनेक बंगल्यात जलतरण तलाव आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यसाठी जलतरण तलाव बांधण्यात येतात. जलतरण तला व बांधण्यास नगरपरिषदेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी बेकायदा जलतरण तलाव बांधले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी लोणावळ्यातील एका बंगल्यात जलतरण तलाव परिसरात वीजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या