‘पिकाला हमी भाव नाही, देणेकरी मागे लागले आहेत, तुमच्या नाकर्तेपणामुळे मी आत्महत्या करत आहे,’ असे शुभेच्छापत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला लिहून जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंदजवळ रानमळा परिसरात शेतकऱ्याने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने पंतप्रधानांना वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे पत्र लिहून व्यथा मांडल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना शेवटची संधी ; तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

दशरथ लक्ष्मण केदारी (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.केदारी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीतून केदारी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. पंतप्रधानांना वाढदिवसाच्या दिवशी दिलेले शुभेच्छापत्र असल्याचे केदारी यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे, असे केदारी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पोलिसांनी केदारी यांनी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली आहे. त्या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक आवश्यक ; शरद पवार यांचे मत

‘मी, दशरथ लक्ष्मण केदारी जीवनास कंटाळालो आहे. राज्य सरकार कांद्याला योग्य भाव देत नाही. टोमॅटोला भाव मिळत नाहीत. करोना संसर्गामुळे झालेले नुकसान; तसेच अतिवृष्टीचा फटका शेतीमालाला बसला आहे. हातात पैसे नाहीत. देणेकरी थांबायला तयार नाहीत. आम्ही काय करायचे सांगा? कांदा बाजारात नेण्यास देखील परवडत नाही. तुम्हाला तुमचे पडले आहे मोदी साहेब. आम्ही भीक मागत नाही. आम्ही हक्काचे मागत आहोत. तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांना पतपेढीवाले दमबाजी करतात. शेतकऱ्यांसारखा जुगार कोणी खेळत नाही. आम्ही दाद कोणाकडे मागायची सांगा,’ असे केदारी यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.‘मी आत्महत्या करत आहे. आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभाव द्या, ही विनंती. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोदी साहेब,’ असे केदारी यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A farmer committed suicide by sending a birthday greeting card to the prime minister pune print news amy
First published on: 18-09-2022 at 21:44 IST