साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त शनिवारी सोन्याला झळाली मिळाली. सोन्याच्या खरेदीसाठी पुण्यामुंबईसह राज्यभरात सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. भाव चढे असूनही ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते.पुण्यात सोन्याचा भाव तोळ्यामागे २२ कॅरेटसाठी ५६ हजार ३०० रुपये तर २४ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये होता. मुंबईतील भाव तोळ्याला २२ कॅरेटसाठी ५६ हजार ५०० रुपये होता. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष सयाम मेहरा म्हणाले की, सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची आज मोठी गर्दी दिसून आली. नजीकच्या काळात सोन्याच्या भावात काही प्रमाणात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली. ग्राहकांची पसंती प्रामुख्याने हलक्या वजनाच्या दागिन्यांना राहिली. यंदा ५ ते ३३ ग्रॅम वजनाचे दागिने आणि १ ते २ ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी यांना जास्त मागणी दिसून आली. विशेष म्हणजे, हॉलमार्किंगमीधल बदलानंतर ग्राहक नाण्यांपेक्षा दागिन्यांना प्राधान्य देत आहेत.

अक्षय्य तृतीयेला यंदा १७ तो १८ टन सोन्याच्या व्यवहार होईल, असा अंदाज आहे. मागील वर्षी अक्षय्य तृतीयेनंतर लगेचच विवाह मुहूर्त सुरू झाले होते. त्यामुळे मागील वर्षी अक्षय तृतीयेला विवाहाच्या दागिन्यांना मोठी मागणी दिसून आली होती. यंदा विवाहाचे मुहूर्त जून-जुलैमध्ये सुरू होत असल्याने मे महिन्यात विवाहाच्या दागिन्यांची विक्री वाढेल, असे मेहरा यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: एमएचटी-सीईटीच्या अर्जात दुरुस्तीसाठी २५ एप्रिलची मुदत

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त सप्ताह अखेरीस आल्याने सोन्याला चांगली मागणी आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दागिने खरेदीला ग्राहकांचे जास्त प्राधान्य आहे. ग्राहकांची आज सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. उद्याही ग्राहकांची गर्दी राहण्याचा अंदाज आहे. हिऱ्याचे दागिने, हलक्या वजनाचे दागिने आणि चांदीच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळाली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दागिन्यांच्या विक्री प्रमाणाचा विचार करता १५ टक्के तर मूल्याचा विचार करता सुमारे ४० टक्के वाढ दिसून आली आहे. – सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

सोन्याचे भाव चढे असून देखील विक्रीत ५ ते १० टक्के वाढ झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते व ते कायम राहिले. लग्नसराईच्या खरेदीचा मुहूर्तही अनेकांनी केला. सर्वच प्रकारचे दागिने, सोन्याच्या तारा, नाणी, बिस्किट आदींना मागणी होती. यावर्षी हिऱ्याच्या दागिन्यांना तरुणाईकडून विशेष पसंती असल्याचे दिसून आले.- अमित मोडक, संचालक-सीईओ, पीएनजी सन्स