कोणत्याही टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा विकसित केल्यास मानवी जीवनासाठी कल्याणकारी आणि पर्यावरण पूरक ठरेल, असे प्रतिपादन नॉर्वे देशाचे कॉन्सूलेट जनरल अर्न जान फ्लोलो यांनी केले.

बांधकाम राडारोडा आणि प्लास्टिकच्या पुनर्वापराविषयी नॉर्वे देशातील तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्यादृष्टीने भारतातील शहरांमध्ये अशा कंपन्यांची गुंतवणूक करण्याच्या अनुषंगाने फ्लोलो यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय शिष्टमंडळाने पिंपरी पालिकेला भेट दिली. सिंटेफ कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ ख्रिस्तीन एंजेल्सन, तोम्रा सिस्टीम कंपनीचे प्रतिनिधी गार्गी पारीख, नॉर्वे दूतावासाचे आर्थिक आणि परराष्ट्र नीती खात्याचे भारतातील सल्लागार राहुल माहेश्वरी यांचा समावेश होता. आयुक्त राजेश पाटील यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. या नंतर झालेल्या बैठकीत शिष्टमंडळ आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराविषयी सविस्तर चर्चा झाली. नॉर्वे येथील सिंटेफ आणि तोम्रा कंपनीच्या वतीने संगणकीय सादरीकरण करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी चिंचवड शहरात प्रगत तंत्रज्ञाचा अवलंब करून विविध प्रकल्प उभारल्यास नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील. नॉर्वे देशाने बांधकाम राडा रोडा आणि प्लास्टिक पुनर्वापरा विषयीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पिंपरी चिंचवड शहराने केल्यास घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यास मदत होईल, असे मत कॉन्सुलेट जनरल अर्न जान फ्लोलो यांनी या वेळी व्यक्त केले.