पुणे : पुणे विमानतळावर शनिवारी रात्री माॅकड्रिल करण्यात आले. त्या दृष्टीने विमानतळावरील वीजपुरवठा वीस मिनिटांसाठी खंडित करून ब्लॅक आउट करण्यात आले. या कालावधीत सर्व यंत्रणांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
विमानतळ प्रशासनाची तयारी आणि संकटकालीन परिस्थितीमध्ये यंत्रणांचा प्रतिसाद पाहण्यासाठी माॅकड्रिल नियोजित करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांपासून पावणेनऊ वाजेपर्यंत विमानतळाचा वीजपुरवठा खंडित करत ब्लॅक आउट करण्यात आले. विमानतळावर येणाऱ्या विमानांनाही आकाशातच घिरट्या घालण्याची सूचना देण्यात आली होती. या दरम्यान उद्घोषणा करून प्रवाशांना या सर्व प्रकाराची कल्पना देण्यात आली.
विमान वाहतूक कंपन्या, विमानतळावरील कर्मचारी, हवाई वाहतूक नियंत्रण विभाग आणि अन्य संबंधित घटकांना त्याबाबतची पूर्वकल्पना देण्यात आली होती, तर कर्मचाऱ्यांना माॅकड्रिल कोणत्या पद्धतीने केले जाणार आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. वीस मिनिटांच्या या माॅकड्रिलमध्ये सर्व घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. माॅकड्रिलपूर्वी आणि त्यानंतर सातत्याने उद्घोषणा होत राहिल्यामुळे प्रवाशांचेही या माॅकड्रिलला सहकार्य मिळाले. माॅकड्रिल यशस्वी झाल्यानंतर विमानतळ परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमानतळ प्रशासन सज्ज असल्याचे या चाचणीतून दिसून आले.