पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत पाळीव श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सचिन कटारिया (रा. गुलटेकडी) असे गुन्हा दाखल केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे.

याबाबत मिशन पाॅसिबल ट्रस्टच्या संस्थापक पद्मिनी पीटर स्टंप यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालक कटारिया यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट भागातील पौर्णिमा टॉवरजवळील इव्हाज ग्रेस हॉटेलसमोर रविवारी (२४ नोव्हेंबर) परिसरात ही घटना घडली. पौर्णिमा टाॅवर परिसरात कटारिया यांचे कार्यालय आहे. कटारिया पौर्णिमा टाॅवर परिसरातून मोटारीतून निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीच्या चाकाखाली पाळीव श्वान सापडले. चाकाखाली सापडल्याने श्वानाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्वानमालकाने याबाबत मिशन पाॅसिबल ट्रस्टच्या संस्थापक पद्मिनी स्टंप यांच्याकडे तक्रार दिली. पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच मोटारीच्या क्रमांकावरुन तपास करुन पोलिसांनी मोटारचालक कटारिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड : लिव्ह इन रिलेशनमधील प्रेयसीची हत्या; मुलाला सोडलं आळंदीत बेवारस

हेही वाचा – सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर… एमएचटी-सीईटी कधी होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वानावर गोळीबार आणि गळफासाची घटना

गेल्या महिन्यात पर्वती दर्शन भागात पाळीव श्वान अंगावर भुंकल्याने एकाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुळशीत एका शेतकऱ्याने श्वानाला गळफास देऊन त्याला झाडाला लटकाविल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. श्वानाला झाडाला लटकविण्यात आल्याचे छायाचित्र प्रसारित करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. श्वान पिसाळल्याने त्याला गळाफास दिल्याचा दावा शेतकऱ्याने पोलीस चैाकशीत केला होता.