लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाच घेताना पकडण्यात आले. तर संबंधित हवालदाराला सहाय्य करणाऱ्या आणखी दोन हवालदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर या दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मोटारीला झालेल्या अपघाताची दखल घेण्यासाठी त्यांनी १३ हजार रुपयांची लाच मागितली होती.
हेही वाचा… पुणे : मार्केटयार्ड जवळील हॉटेलला लागलेल्या आगीत २ कामगारांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
तक्रारदार व्यक्तीचा खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. त्यांच्या एका गाडीला अपघात झाला होता. याची तक्रार देण्यासाठी ते येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. तीनही हवालदारांनी त्यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती हा सर्व व्यवहार १३ हजार रुपयात ठरला होता.
हेही वाचा… पुणे: जी-२० परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी अनुभवला पालखी सोहळा
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत विभागाचे अधिकारी येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात नजर ठेवून होते. त्यानंतर मध्यरात्री तक्रारदार व्यक्तीची तक्रार दाखल करून घेतली. आणि त्यानंतर लाच स्वीकारत असताना दीक्षित याला रंगेहात पकडले.