पुणे शहरातील मेट्रो कोणामुळे झाली, यावरून महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मंगळवारी खडाजंगी झाली. भाजपने दहा वर्षात काहीच केले नाही. मेट्रो प्रकल्प काँग्रेसमुळे झाला, असा दावा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच मेट्रो मार्ग व विस्तार झाला असून काँग्रेस उमेदवाराला मेट्रोमध्ये बसूनच समाजमाध्यमांसाठीचे ‘रील’ करावे लागत आहेत, असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगाविला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुण्यातील उमेदवारांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यामध्ये सहभागी झाले होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा… विधानपरिषदेसाठीच आबा बागुल यांची भाजप बरोबर जवळीक ?

दहा वर्षात काय केले हे भाजपला सांगता आले नाही, अशी टीका धंगेकर यांनी केली. भाजपच्या कार्यकाळातच नव्या विमानतळाचे काम सुरू असून मेट्रो मार्गिकांचे विस्तारीकरणाला मान्यता दिल्याचा दावा मोहोळ यांनी केला. त्यावर केवळ रंगरंगोटी करणे म्हणजे विमानतळ करणे असा होत नाही. विस्तार करणे म्हणजे काम करणे नाही. मेट्रो प्रकल्पाला काँग्रेसने मान्यता दिली. यात भाजपचे काहीच श्रेय नाही, असे उत्तर धंगेकर यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या मेट्रोमधूनच धंगेकर यांना ‘रील’ करावी लागत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केला. पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट आणि अनिल शिरोळे यांनी काम कामे केली, सभागृहात बापट आणि शिरोळे किती वेळा बोलले, अशी विचारणा धंगेकर यांनी केली. त्यालाही मोहोळ यांनी आक्षेप घेतला.

हेही वाचा… पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा

दरम्यान, कात्रजच्या विकासाचा पॅटर्न शहरात राबविण्यात येईल. विकासाचे अहवाल केले जातात. मात्र, ते निवडणूक झाल्यावर झाकून ठेवले जातात, अशी टीका वसंत मोरे यांनी केली.