पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार झाला. याप्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, रा. महालगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत कारागृहातील शिपाई अविनाश पवार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वारजे पोलीस ठाण्यात दुसानेविरुद्ध २०१५ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात न्यायालयाने त्याला २४ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. दुसाने याची वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती. खुल्या कारागृहात शिक्षा सुनावलेल्या कैद्यांकडून शेती केली जाते, तसेच विविध व्यवसाय रोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते.

हेही वाचा >>>पोलिसांकडून राखी पौर्णिमेची अनोखी भेट; गहाळ झालेले ४० मोबाइल संच तक्रारदारांना परत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसाने सोमवारी (१९ ऑगस्ट) खुल्या कारागृहात काम करत होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कैद्यांची हजेरी घेण्यात आली. तेव्हा दुसाने तेथे नसल्याचे निदर्शनास आले. दुसानेचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा ठावठिकाणा न लागल्याने रात्री पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. कारागृहातून पसार झाल्याप्रकरणी दुसानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जायभाये तपास करत आहेत.