भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) एका विद्यार्थिनीने प्राध्यापकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी आंदोलन केले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
हेह वाचा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात हवी डबल डेकर बस
संबंधित विद्यार्थिनीने सहा वर्षे अभ्यास करून तयार केलेला पीएच.डी. प्रबंध तिच्या एका प्राध्यापकाने परस्पर दुसऱ्या विद्यार्थिनीच्या नावाने जमा केला. या विरोधातील तक्रारीला दाद न दिल्याने, सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अभाविपतर्फे सोमवारी आयसर पुणेमध्ये आंदोलन करण्यात आले. प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, प्रदेशसहमंत्री आनंद भुसार, गौरी पवार आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा- तरुणांनी धुडगूस घातल्यानंतर गौतमी पाटीलने कार्यक्रम थांबवला, व्हिडीओ आला समोर
नियामक मंडळासमोर चौकशी
दरम्यान, संस्थेने या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली आहे. मात्र, तक्रारदार आणि कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे प्रकरण संस्थेच्या नियामक मंडळासमोर ठेवले जाणार असल्याचे स्पष्टीकरण आयसर पुणेकडून देण्यात आले.