पुणे : गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
ओंकार सचिन माेरे (वय २३, रा. मुठा काॅलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शरद मोहोळ याचा ५ जानेवारी २०२४ सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार हे कोथरूड भागातील सुतारदरा भागात सोमवारी गस्त घालत होते. त्या वेळी मोहोळचा साथीदार ओंकार मोरे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मोकाशी आणि कुंभार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडली.
गुन्हे शाखेचे पोलीस निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक नितीन कांबळे, संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओंकार कुंभार, हनुमंत कांबळे यांनी ही कामगिरी केली.
जानेवारी महिन्यात मोहाेळच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेले शरद शिवाजी मालपोटे (वय २९), संदेश लहू कडू (वय २४, दोघे रा. कोथरूड) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त करण्यात आली होती.
मोहोळ खून प्रकरणात ‘मकोका’ कारवाई
वर्चस्वाच्या वादातून गणेश मारणे टोळीने शरद माेहोळ याचा खून केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार, गणेश मारणे, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. मोहोळ खून प्रकरणात १६ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती.