पुणे: शासकीय रक्तपेढ्यांतील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी साखळी पद्धतीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ९३ महाविद्यालयांमध्ये डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय रक्तपेढ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शहरात मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात असूनही शासकीय रक्तपेढ्यांमध्ये कधीतरी रक्ताचा तुटवडा जाणवतो. शासकीय रक्तपेढ्यांसमवेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे प्रमाण कमी असल्याचे कारण त्या मागे आहे. शासकीय रक्तपेढी कोणतेही आमिष न दाखवता नि:स्वार्थ, स्वेच्छेने, सर्व नियमांचे काटेकोर पालन करून रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. त्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना संलग्नित महाविद्यालये, ससून सर्वोपचार रुग्णालयातील प्रादेशिक रक्तकेंद्र विभाग यांच्यातर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ९३ महाविद्यालयांमध्ये साखळी पद्धतीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा… आळेफाटा येथील रहिवासी सोसायटीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
साखळी पद्धतीने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत होणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व महाविद्यालये सहभागी होतील. तसेच ससून सर्वोपचार रुग्णालयातील प्रादेशिक रक्तकेंद्र विभागाच्या चमूसह रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या परिपत्रकासह ९३ महाविद्यालयांची यादी आणि रक्तदानाचे वेळापत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.