पुणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना मुलांवर संस्कार करून त्यांना सामाजिक कार्यासाठी मोकळीक देऊन कार्यकर्ता घडविणाऱ्या २१ मातांचा रविवारी हृद्य मातृगौरव सोहळा अनेकांनी डोळ्यांत साठवून ठेवला. मातेचे नाव पुकारताच सुवासिनींकडून होणारे औक्षण, कार्यकर्ता मुलाने प्रेमाने भरविलेला लाडू आणि सर्वांच्या डोळ्यांतून तरळणारे आनंदाश्रू अशा वैशिष्ट्यांमुळे कार्यक्रमात भावनिक ओलाव्याचे रंग भरले गेले.
जागतिक मातृदिनानिमित्त जय गणेश व्यासपीठच्या वतीने शहराच्या विविध भागांतील २१ गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मातांचा विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार हेमंत रासने, लक्ष्य फाऊंडेशनच्या प्रमुख अनुराधा प्रभुदेसाई, ॲड. प्रताप परदेशी याप्रसंगी उपस्थित होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शहा, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, वीर शिवराज मित्र मंडळाचे किरण सोनीवाल (वीर शिवराज मित्र मंडळ), श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद थोरात आणि ॐ हरिहरेश्वर मंडळाचे राहुल जाधव यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जोशी म्हणाले, ‘परमेश्वराने हे जग निर्माण केले आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय येत राहावा यासाठी त्याने आईची निर्मिती केली. मुलांचे भावनिक भरणपोषण करणारी आई हे जगातले सर्वोत्तम विद्यापीठ आहे. पैशातील गुंतवणुकीइतकीच नात्यातील गुंतवणूक महत्त्वाची आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक जीवनात कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्यांना हारांपेक्षा प्रहारच अधिक मिळतात. प्रसंगी टीका आणि अपमान सहन करावा लागतो. कार्यकर्त्यांनी कौतुकाने भारावून जायचे नसते आणि टीकेने व्यथित व्हायचे नसते. कसलीही अपेक्षा न ठेवता हे आभारशून्य काम करावे लागते. ते करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. घर व्यवस्थित असेल तरच बाहेरच्या लढाया लढता येतात.’
प्रभुदेसाई म्हणाल्या, ‘गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे काम बघता तेही खऱ्या अर्थाने योद्धे आहेत. समाजासाठी काम करण्यासाठी कुटुंबीयांचे पाठबळ आवश्यक असते. नि:स्वार्थ भावनेने कार्यकर्ते समाजासाठी काम करीत आहेत.’
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्याच्या आईचा सत्कार ही अभिनव कल्पना आहे. पुण्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख निर्माण करून देण्यात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. मी स्थायी समिती अध्यक्ष असताना कधीही महापालिकेत न आलेली आणि आता आमदार झाल्यानंतर विधिमंडळातही न आलेली माझी आई या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच व्यासपीठावर बसली आहे.
हेमंत रासने, आमदार