संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम… माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, प्रतीक घोडके, राजू वायकर, रोहित लोंढे यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार), युवराज विहानराजे शितोळे (सरकार), श्रीमंत सौ. मोहिनीराजे शितोळे (सरकार) यांसह पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी शितोळे सरकार म्हणाले, दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. आता दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत.वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात,असे देखील त्यांनी सांगितले.