पुणे : शहरात दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेले. वारजे आणि प्रभात रस्ता परिसरात या घटना घडल्या.

किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने वारजे माळवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीचे वारजे भागातील सिप्ला फाऊंडेशनजवळ असलेल्या पूजा हायलँड सोसायटीत तळमजल्यावर किराणा माल विक्री दुकान आहे. शनिवारी (११ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास दुकानात दूध खरेदीच्या बहाण्याने दोन चोरटे दुकानात शिरले. त्यावेळी महिला दुकानात एकटी होती. चोरट्यांनी पैसे देण्याचा बहाणा करुन महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चाेरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी वारजे परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक रायगौंडा तपास करत आहेत.

प्रभात रस्ता परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला प्रभात रस्त्यावरील कमला नेहरु उद्यानाजवळील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शनिवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४ परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा दुचाकीवरुन पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत

नारायण पेठेत महिलेचा मोबाइल हिसकावला

नारायण पेठेत महिलेचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नारायण पेठेतील गोगटे प्रशालेजवळ राहायला आहेत. त्या १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कामावरुन घरी जात होत्या. गोगटे प्रशालेजवळ त्यांनी दुचाकी लावली. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्लया चोरट्याने त्यांचा २५ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस हवालदार साळवे तपास करत आहेत.