पुणे : खासगी रुग्णालयातील निवासी डाॅक्टर तरुणाने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. डाॅक्टर तरुणाच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नसून, कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाचा मोबाइल संच तांत्रिक विश्लेषणासाठी ताब्यात घेतला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे.

डाॅ. श्याम व्होरा (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. डाॅ. व्होरा मूळचे गुजरातचे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती कळविण्यात आली असून, कुटुंबीय पुण्यात पोहोचले आहेत. ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. सायंकाळी कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. व्होरा एका खासगी रुग्णालयात निवासी डाॅक्टर म्हणून काम करीत होते. रविवारी (८ जून) दिवसभर त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा न उघडल्याने सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी या घटनेची माहिती रुग्णालयाच्या वसतिगृहातील सुरक्षारक्षकांना दिली. रविवारी रात्री दहाच्या सुमारास सुरक्षारक्षकांनी दरवाजा वाजविला. डाॅ. व्होरा यांनी प्रतिसाद न दिल्याने संशय आला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली.

वसतिगृहातील खोलीचा दरवाजा तोडण्यात आल्यनंतर डाॅ. व्होरा यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. खोलीत एक चिठ्ठी सापडली असून, त्यात मोबाइलचा सांकेतिक शब्द (पासवर्ड) लिहून ठेवला आहे. पोलिसांनी तपासासाठी मोबाइल ताब्यात घेतला आहे. डाॅ. व्होरा यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृत्यूमुळे सहकाऱ्यांना धक्का

डाॅ. व्होरा हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय परिसरात शोककळा पसरली.

चौकशी पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष नोंदविणे अयोग्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डाॅ. व्होरा हे निवासी डाॅक्टर होते. त्यांनी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही माध्यमांनी कामाच्या ठिकाणी झालेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा प्रकारचे अंदाज वर्तवणे चुकीचे आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये,’ असे रुग्णालयाच्या कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.