लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) राज्यातील दहावी आणि बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणांच्या प्रस्तावासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीचे ‘आपले सरकार’ संकेतस्थळ १४ एप्रिलपर्यंत देखभालीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार असून, जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येतात. जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरासाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार सवलतीचे गुण दिले जातात. क्रीडा गुणांसाठी गेल्या वर्षीपर्यंत त्यासाठी प्रत्यक्ष अर्ज (ऑफलाइन) करावा लागत होता. यंदा पहिल्यांदाच या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. त्यासाठी राज्य मंडळ आणि आपले सरकार संकेतस्थळ यांच्याकडून स्वतंत्र शुल्क आकारले जात असल्याने सवलतीच्या गुणांसाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. याबाबत शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातून नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.
सवलतीच्या क्रीडा गुणांच्या ऑनलाइन प्रस्तावांची आपले सरकार या संकेतस्थळाद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाने सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आपले सरकार संकेतस्थळ देखभालीच्या कामासाठी १० ते १५ एप्रिल या कालावधीत बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एकच दिवस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने जिल्हा क्रीडा कार्यालयाने सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.