पुणे : नवीन बांधलेल्या घराचा कर कमी करण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील दोन लिपिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. सुमीत राजेंद्र चांदेरे (वय २८), प्रशांत शिवाजीराव घाडगे (वय ३४) अशी अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत. रात्री उशिरा दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

हेही वाचा >>> Pune Porsche Accident: कल्याणीनगर प्रकरणात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून अपघात प्रभाव मूल्यांकन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराने नवीन घर बांधले आहे. कर आकारणीसाठी तक्रारदाराने क्षेत्रीय कार्यालयात अर्ज केला होता. कर आकारणी कमी करून देतो, असे क्षेत्रीय कार्यालयातील लिपीक घाडगे याने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. त्यासाठी घाडगे आणि चांदेरे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. ज्येष्ठ नागरिकाने याबाबत तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा लावून तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच घेणाऱ्या चांदेरे आणि घाडगे यांना पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी ही कारवाई केली.