पुणे : राज्यातील उसाच्या गाळप हंगामाला गती आली आहे. सात डिसेंबरअखेर एकूण १८२ कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला आहे. रोज सरासरी आठ लाख टन क्षमतेने गाळप सुरू असून, एकूण सुमारे २८४ लाख टन उसाचे गाळप होऊन २५२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार सात डिसेंबरअखेर सहकारी ९१ आणि खासगी ९१, असे एकूण १८२ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. साखर विभागनिहाय विचार करता सोलापूर आघाडीवर असून, सर्वाधिक ४५ कारखाने सुरू आहेत. त्या खालोखाल कोल्हापूर विभागात ३४, पुणे विभागात २८, नांदेड विभागात २६, नगर विभागात २४, औरंगाबाद विभागात २०, नागपूर विभागात तीन, तर अमरावती विभागात फक्त दोन कारखाने सुरू झाले आहेत. गाळप आणि साखर उत्पादनात विभागनिहाय कामगिरी अशीच आहे. फक्त उताऱ्यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली असून, साखर उतारा १०.२८ इतका सर्वोच्च आहे.
मागील वर्षी खासगी आणि सहकारी मिळून एकूण २०० कारखाने सुरू होते, त्या तुलनेत अद्यापही अठरा कारखाने सुरू होणे बाकी आहे. लांबलेला मोसमी पाऊस, परतीच्या पावसाने उडविलेली दाणादाण, दसरा, दिवाळी आदींमुळे हंगाम सुरू होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे यंदा उसाचे गाळप वेळेत पूर्ण होईल की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षांसारखे मराठवाडय़ातील उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोडणी यंत्रे पाठवावी लागली होती.
यंदा गाळप हंगाम उशिराने सुरू झाला असला तरीही खोडवा उसाचे प्रमाण जास्त आहे. खोडवा उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन कमी असते. त्यामुळे हंगाम वेळेत पूर्ण होईल. जूनपर्यंत हंगाम सुरू राहणार नाही. शिल्लक उसाची समस्या यंदा फारशी जाणवणार नाही. इथेनॉलला चांगला दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत असलेल्या साखरेच्या दराचा फायदा कारखान्यांना होणार आहे.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त