पुणे : वैमनस्यातून कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या चौघांची फरासखाना पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले. कसबा पेठेतील कागदीपूरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयूर गणेश अडागळे (वय १९), मंथन प्रकाश सकट (वय १९, दोघे रा. पीएमपी काॅलनी, कागदीपुरा, कसबा पेठ), ओम देविदास शिंदे (वय १९, रा. शिंदे वाडा, पारगे चौक, मंगळवार पेठ), सोहम राजेंद्र हराळे (वय २०, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, कवडेवाडी, कोरेगाव पार्क) यांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासीन इम्तियाज शेख (वय २९, रा. राम-रहिम मित्र मंडळाजवळ, कागदीपुरा, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

शेख यांचे गेल्या वर्षी आरोपी अडागळे, सकट यांच्याशी भांडण झाले होते. भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी मध्यरात्री अडागळे, सकट, हराळे, शिंदे आणि अल्पवयीन साथीदारांनी कागदीपुरा भागात कोयता उगारून दहशत माजविली. तक्रारदार शेख यांच्या रिक्षाची काच फोडली. रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची तोडफोड करून आरोपी पसार झाले. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची फरासखाना पोलिसांनी  धिंड काढली. ज्या ठिकाणी त्यांनी वाहनांची तोडफोड केली. त्याच भागातून त्यांची धिंड काढण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबवेवाडी, येरवडा, कसबा पेठ भागात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, त्यांची धिंड काढा, असा आदेश जाहीररीत्या दिला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तोडफोड करणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचा आदेश पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिला आहे.