लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने कारवाईचा दंडुका उगारला आहे. एक ते ३० नोव्हेंबर या अवघ्या महिन्या भराच्या कालावधीत ३२ हजार ७७५ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत दोन कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढत आहे. वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीशी निगडीत होणाऱ्या अपराधांची संख्या देखील वाढू लागली आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

आणखी वाचा-दहावी, बारावीच्या परीक्षेच्या गुणांबाबत सीबीएसईने घेतला मोठा निर्णय… नेमकं होणार काय?

नोव्हेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत दोन कोटी ७२ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ६०७ वाहन चालकांवर थेट खटले दाखल केले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी केलेल्या मार्गावर प्रवेश करणाऱ्या सहा हजार ३७२ जड अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. महिन्याभरात ३२ हजार ७७५ वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणाऱ्या ९३९, वाहतूक नियंत्रक दिवा (सिग्नल) तोडणाऱ्या एक हजार ७२८, दुचाकीवरून तिघे जण प्रवास करणाऱ्या तीन हजार ५५९, विना हेल्मेट दोन हजार ८८०, सुरक्षा बेल्ट परिधान न करणाऱ्या दोन हजार २२०, काळी काच असलेल्या एक हजार ३९० वाहनांवर, सायलेन्सर जोरात वाजविणाऱ्या ८८४, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आठ हजार ९६७ आणि बीआरटी मधून वाहन चालविणाऱ्या तीन हजार २२९ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे.