रास्त व किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) २०१४- १५ या हंगामात शेतकऱ्यांना रक्कम अदा न करणाऱ्या बारा साखर कारखान्यांवर गाळप परवाने निलंबित करण्याची कारवाई साखर आयुक्त बिपिन शर्मा यांनी सोमवारी केली. साखर आयुक्तालयाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कठोर कारवाईची भूमिका घेण्यात आली आहे. परवाना निलंबित करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्य़ातील प्रत्येकी तीन, तर सातारा, पुणे व नाशिक जिल्ह्य़ातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे.
शर्मा यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले,‘‘ ३२ कारखान्यांकडे मागील वर्षांच्या गाळपाची थकबाकी आहे. त्यातील १३ कारखाने बंद पडल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सात कारखान्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधी भरला नसल्याने त्यांना प्रतिटन पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यांना गाळपाचा परवानाही मिळणार नाही. मात्र, ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली  नाही, त्या कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करून त्यांच्यावर सोमवारपासूनच कारवाई सुरू करण्यात आली आहे.’’
यंदाच्या हंगामात एकूण १७० कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये ९४ सहकारी व ७६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. राज्यात यंदा ३८३ लाख टन उसाचे गाळप होऊन ४०७ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामध्ये एकूण १०.५३ टक्के उतारा राहिला आहे. फेब्रुवारी अखेपर्यंत सर्व ठिकाणचे गाळप पूर्ण होईल, अशी माहितीही शर्मा यांनी दिली.
दरम्यान, मागील हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २०० कोटींची थकबाकी होती. यंदाच्या हंगामातही सुमारे चौदाशे कोटी रुपयांची थकबाकी येणे आहे. ही रक्कम तातडीने मिळावी, अन्यथा त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारवाई झालेले साखर कारखाने

  सांगली जिल्हा

– महाकाली सहकारी साखर कारखाना
– मानगंगा सहकारी साखर कारखाना
– यशवंत साखर कारखाना, खानापूर (खासगी)
 सातारा जिल्हा
– प्रतापगड किसानवीर सहकारी साखर कारखाना
  पुणे जिल्हा
– भीमा पाटस सहकारी साखर कारखाना
सोलापूर जिल्हा
– शंकर सहकारी साखर कारखाना
– पुरमदास सहकारी साखर कारखाना
– शंकररत्न साखर कारखाना (खासगी)
  नगर जिल्हा
– अगस्ती सहकारी साखर कारखाना
– वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना
– प्रसाद साखर कारखाना (खासगी)
  नाशिक जिल्हा
– गिरणा साखर कारखाना

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on 12 sugar factories
First published on: 12-01-2016 at 03:22 IST