पुणे: शहरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढते असून, पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या चार महिन्यांत सव्वातीन लाख वाहनचालकांवर कारवाई केली. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ७५ हजार ७१३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा एप्रिल महिना अखेरीपर्यंत तीन लाख २२ हजार जणांवर वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेशिस्तांवर करण्यात येणाऱ्या कारवाईत पाचपटींनी वाढ झाली आहे.
विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, तसेच मोबाइलवर संभाषण करणे अशा प्रकारच्या वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढते आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे काेंडीत भर पडते. बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिना अखेरीपर्यंत ७५ हजार ७१३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.
यंदा एप्रिल महिना अखेरीपर्यंत तीन लाख २२ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजककुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात बेशिस्तांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे प्रमाण वाढतेविरुद्ध दिशेने (नो एंट्री) वाहन चालविण्याचे प्रमाण वाढते आहे. यंदा जानेवारी महिन्यात ५७ हजार ३३ वाहनचालकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली. फेब्रुवारी महिन्यात ५० हजार ८१८, मार्च महिन्यात ५९ हजार ७३ आणि एप्रिल महिन्यात ४५ हजार २३३ वाहनचालकांविरुद्ध विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. चार महिन्यात दोन १२ हजार १५७ वाहनचालकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी ही माहिती दिली.