पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात लावलेल्या अनधिकृत फलकावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी कारवाई केली. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले अनधिकृत फलक महापालिकेने काढले आहेत. ‘अनधिकृत फलक लावू नका, याबाबत आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगा,’ अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकतेच शहरातील लोकप्रतिनिधींना दिले आहे. मात्र, त्यानंतरही कार्यकर्ते अनधिकृत फलक लावत असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीगाव येथे ४ ते १९ मे या कालावधीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीतील नवमहाराष्ट्र मैदानावर या स्पर्धा होत असून, मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागताचा अनधिकृत फलक लावण्यात आला होता. महापालिकेचे पथक साेमवारी या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झाले. मात्र, तेव्हा आयोजकांचे समर्थक आणि कर्मचाऱ्यांत वाद झाला. त्यानंतर दुपारी पुन्हा अतिक्रमण विभागाचे पथक पिंपरीगावात गेले आणि त्यांनी अनधिकृत फलकावर कारवाई केली.
वादळी वारे, अवकाळी पावसामुळे हाेर्डिंग काेसळून दुर्घटना घडू नये, यासाठी हाेर्डिंगवर १५ एप्रिल ते १५ जून या दाेन महिन्यांच्या कालावधीमध्ये जाहिरात फलक लावू नका, असा आदेश आकाशचिन्ह व परवाना विभागाने हाेर्डिंगधारकांना दिला आहे. शहरात कुणीही अनधिकृत फलक लावल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जात आहे. शहर अनधिकृत फलकमुक्त करण्याचा निर्धार आहे, असे आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी सांगितले. तर, कार्यकर्त्यांनी फलक लावले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेने फलक काढले आहेत. फलक काढण्याबाबत काही हरकत नाही, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले.