पुणे : ‘राजकारणाबाबतच्या चर्चेतून काहीही निष्पन्न होत नाही, लोकांचे केवळ मनोरंजन होते. मराठी माणसासाठी, त्यातही मध्यमवर्गीयांसाठी राजकारण, क्रिकेट आणि अभिनेते-अभिनेत्रींचे आयुष्य हे चर्चेचे विषय असतात,’ असे मत अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी रविवारी व्यक्त केले.
द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे ‘द. मा. मिरासदार पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते कऱ्हाडे यांना प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात प्रसाद मिरासदार यांनी कऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी कऱ्हाडे बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी, ज्येष्ठ लेखक प्रा. वसंत मिरासदार, शरयू मिरासदार, सुनेत्रा मंकणी उपस्थित होते.
कऱ्हाडे म्हणाले, ‘अभिनयाचे क्षेत्र हे अस्थिर आणि अनिश्चिततेने भरलेले आहे. या क्षेत्रात कष्ट करून संधी निर्माण करायच्या असतात. कोणीही तुमच्यासाठी संधी घेऊन येत नसतो. आधी केलेल्या कामापेक्षा पुढचे काम अधिक चांगले कसे होईल, याचा विचार करत रहायला हवे. एकमेकांना वेळ न देण्याच्या जमान्यात पाचशे रुपये खर्च करून माझे नाटक पहायला रसिक मायबाप तीन तास खर्ची घालतात. हे प्रेक्षक आणि श्रोते ही माझी श्रीमंती आहे.