पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) ५.४६ किलोमीटर अंतराच्या स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेचे काम अदानी समूहाच्या ‘आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड’ या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीची १,६४३.८८ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

‘केंद्र सरकारने स्वारगेट-कात्रज या भूमिगत मेट्रो प्रकल्पासाठी २,९५४ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी महामेट्रोने निविदा प्रकिया राबवली. त्यामध्ये सहा कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. गेल्या १९ सप्टेंबरला उघडण्यात आलेल्या निविदांत अदानी समूहाच्या ‘आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड कंपनी’ची निविदा सर्वांत कमी किमतीची होती. गुणवत्ता, अनुभव, तंत्रज्ञानाच्या निकषांवर पडताळणी झाल्यानंतर या कंपनीला काम देण्यात आल्याचा निर्णय झाला,’ असे महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क-प्रशासन) चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.

‘येत्या महिनाभरात कर्जपुरवठा आणि अन्य निकषांबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर प्रकल्पाचे काम सुरू होणार असून, २०२९ पर्य़ंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे,’ असे तांबवेकर यांनी स्पष्ट केले.

निविदा प्रक्रियेला विलंब

या प्रकल्पासाठी मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज ही तीन स्थानके निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार जानेवारी २०२५ मध्ये निविदा मागविण्यात आल्या. मात्र, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांनी बिबवेवाडी आणि बालाजीनगर या दोन ठिकाणी स्थानकांची मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन स्थानकांना मंजुरी देण्याचे आदेश दिले. महामेट्रोकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्यानंतर ही दोन स्थानके वाढविण्यात आली. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये सुधारित निविदा प्रक्रिया राबिवण्यात आल्याने प्रकल्पाला विलंब झाला.