पुणे : ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने’ (एआरएआय) देशातील वाहनांची स्वयंचलित सुरक्षितता आणि कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकले आहे. वाहतूक सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या ‘प्रगत वाहनचालक सहाय्य प्रणाली’ (ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम – एडीएएस) हे नवे चाचणी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, वाहन क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी टाकवे आणि चाकण येथे ‘एडीएएस’ हे अत्याधुनिक चाचणी तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘एआरएआय’कडून मावळ तालुक्यातील तळेगाव जवळील टाकवे येथील २० एकर क्षेत्रावर गेल्या वर्षांपासून या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित केंद्राचे काम सुरू होते. सध्या ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून १२ डिसेंबर रोजी नवीन ‘एडीएएस’ या तंत्रज्ञान प्रणाली केंद्राचा देशविदेशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत वाहनांच्या निरनिराळ्या चाचण्या घेऊन सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एआरएआय’चे संचालक डाॅ. रेजी मथाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘एआरएआय’चे वरिष्ठ उपसंचालक विजय पंखवाला, एआरएआयच्या उज्ज्वला काळे, ‘आयेरा’चे संचालक सईद अहमद उपस्थित होते.

डाॅ. मथाई म्हणाले, ‘दिवसेंदिवस वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित होत आहे. वाहनांची आणि वाहनचालकांची स्वयंचलित सुरक्षितता निश्चित करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नवनवीन संशोधन सुरू आहे. देशातील रस्त्यांची परिस्थिती, गर्दी, वाहतूक कोंडी, अपघात आणि इतर वाहतूक समस्यांच्या दृष्टीने वाहनांची क्षमता, उर्जा याची प्रभावी अंमलबजावणी करून सुरक्षित वाहन आणि प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ‘एआरएआय’ विविधांगी प्रयोग, चाचण्या करत आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीद्वारे चाचणी केंद्र आवश्यक होते. टाकवे आणि चाकण केंद्रातून ही सुविधा प्राप्त होणार असून भारताच्या रस्त्यांवरील सुरक्षा आणि वाहन चालकांचे सहकार्य वाढवण्यासाठी ‘एडीएएस’ अत्यंत महत्त्वाचे आहे. हे चाचणी केंद्र देशातल्या वाहन उद्योगाला आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे ठरेल.’

‘आयेरा या कंपनीमार्फत १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘एडीएएस’ प्रदर्शनामध्ये विविध वाहन उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या, आणि संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी होंडा, बीएमडब्ल्यू, व्होल्वो, महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, तसेच बाॅश, एनएक्सपी, झेडएफ, वेलीओ यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. यावेळी प्रत्यक्षा वाहनांची चाचणी, तज्ज्ञांचे चर्चासत्र आणि नवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण होणार आहे,’ असे डाॅ. मथाई यांनी नमूद केले.

चाकणमध्ये बॅटरी चाचणी सुविधा केंद्र

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून सिलिंडर उत्पादकांना स्वदेशी उत्पादनाची चाचणी करण्यास सक्षम करेल, त्याचबरोबर ‘उच्च उर्जा प्रभाव चाचणी’ (हाय एनर्जी इम्पॅक्ट टेस्ट फॅसिलीटी) आणि अनेक सुविधांंचा अंर्तभाव या ठिकाणी करण्यात आला आहे. भविष्यातील मानकांनुसार भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एआरएआयच्या चाकण सेंटरमध्ये एक प्रगत बॅटरी सुरक्षा चाचणी सुविधा देखील स्थापित केली जात असल्याचे पंखवाला यांनी सांगितले.

कोणत्या सुविधा उपलब्ध?

– टेस्टिंग ट्रॅक

– सिलिंडर तपासणी सुविधा आणि प्रमाणपत्र केंद्र

– हायड्रोजन तपासणी सुविधा (एचसीटी)

– उच्च उर्जा प्रभाव चाचणी सुविधा (एचएआयटीएफ)

– ॲडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सिस्टिम (एसीसी)

– ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन (बीएसडीएस)

– ऑटोमॅटिक पार्किंग सिस्टिम (पीएएस)

– लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम (एलडीडब्ल्यूएस)

– ॲडाप्टिव्ह ब्रेकिंग सिस्टिम (एईबीएस)

– नाइट व्हिजन सिस्टिम (एनव्हीएस)

– ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टिम (डीएमएस)

– ट्रॅफिक साइन रेकग्निशन (टीएसआर)

– वॉर्निंग व कोलिजन सिस्टिम (एफसीडब्ल्यू)

– फिक जॅम असिस्टन्स (टीजेएएस)