पुणे : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ६६व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने सहा पदके पटकावली आहेत. त्यात महाराष्ट्राच्या आधित्य मंगुडीने सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत भारत ७व्या स्थानी असून, सलग तिसऱ्यांदा भारतीय संघाने पहिल्या दहा संघात स्थान मिळवले आहे.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेत जगभरातील ११० देशांतील एकूण ६३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. भारतीय संघातील दिल्ली येथील कणव तलवारने, आरव गुप्ता, महाराष्ट्रातील आधित्य मंगुडी यांनी सुवर्णपदक, कर्नाटकातील अबेल जॉर्ज मॅथ्यू, दिल्ली येथील अधीश जैन यांनी रौप्य पदक, दिल्लीतील आर्चित मानसने कांस्य पदक मिळवले.

भारतीय संख्याशास्त्र संस्थेतील प्रा. शांता लैश्राम यांच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शकांच्या चमूमध्ये डॉ. मैनाक घोष, अतुल शतावर्त नाडिग, डॉ. राजू सैनी यांचा समावेश होता.

भारताने या स्पर्धेत तिसऱ्यांदा ७वे स्थान मिळवले आहे. भारताला आतापर्यंतचे सर्वोत्तम ४थे स्थान गेल्यावर्षी मिळाले होते. १९९८नंतर सलग दुसऱ्या वर्षी भारतीय संघाने तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. गेल्यावर्षी भारतीय संघाने ४ सुवर्णपदके मिळवून इतिहास घडवला होता. १९८९पासून भारताने २३ सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यापैकी १२ सुवर्णपदके २०१९ ते २०२५ या काळात मिळाली आहेत, तर त्यातील नऊ सुवर्णपदके २०२३, २०२४, २०२५ या तीन वर्षांतील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा मुलभूत संशोधन संस्थेतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र या विषयांतील आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षणासाठी केंद्र संस्था म्हणून काम करते. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षा आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये बीजगणित, संयोजनशास्त्र, संख्या सिद्धांत, भूमिती या विषयांवरील प्रश्न विचारले जातात.